कुंपणाआड आकाश
कुंपणातही आकाश,
आतमध्ये आहे जग
बाहेरचा तो आभास
आत आपली माती
कुंपणाआड चिखल,
तिथे आहे राक्षस
आतला तो विठ्ठल
कुंपणा आत आहे
सुगंधित मोगरा,
कुंपणातल्या कचऱ्याचा
कुंपणाबाहेर ढिगारा
कुंपणा आत जेवायला
सुग्रास असे भोजन,
कुंपणावर संध्याकाळी
सजतं निरांजन
चंद्राला, सूर्याला आणि ना
निसर्गाला, कुंपणाचा हा भेद,
माणसा माणसातलं कुंपण
हाच परमेश्वराला खेद
संपूर्ण जगात जेव्हा
एकही कुंपण नसेल,
आपल्यातला परमेश्वर
पुन्हा एकदा हसेल
सगळ्यांची मनं जेव्हा
एक होऊन जातील,
परमेश्वराबरोबर तुमची
तेव्हाच भेट होईल!